rachyatidevelopers

घर पहावे बांधून… (फ्लॅट की प्लॉट)

स्वतःची जागा घेऊन घर बांधणे हे आपल्या आई-वडिलांच्या पिढीपर्यंत एक मोठे स्वप्न समजले जायचे. स्वतःचे घर बांधून पूर्ण झाले म्हणजे आपण एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झालो आहोत असा भाव असायचा. घर बांधताना घराचा कच्चा आराखडा तयार करण्यापासून घर तयार झाल्यानंतर घर सजवताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालून आपल्या आवडीनिवडीप्रमाणे त्या खरेदी करून घर सजवणे हा आनंदाचा एक सोहळाच होता जणू. छोट्या घरात किंवा चाळीत राहात असताना मोठ्या जागेची स्वप्न पडत असत. देवासाठी, शोभेसाठी, किंवा लहान मुलींना आवडतात म्हणून गजरा करण्यासाठी शेजाऱ्यांकडून फुलं मागून आणतांना आपल्या स्वतःच्या, भविष्यातल्या घराभोवतलाची बाग सतत डोळ्यासमोर तरळत राही. 

आता मात्र परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. भाड्याच्या घरात राहताना आपलं स्वतःचं घर असावं हे स्वप्न काही बदललं नसलं, तरी ते स्वतःचं घर नवीन जागा घेऊन आपण स्वतः बांधण्यापेक्षा आता अनेक जण मोठ्या शहरांमध्ये तयार फ्लॅट खरेदी करणे पसंत करतात. मोठ्या शहरांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याकरिता किंवा रहाण्यासाठी म्हणून सुद्धा आज काल लोक प्लॉटऐवजी फ्लॅटच निवडतात. 

मात्र फक्त हौस किंवा स्वप्न म्हणून या दोन्हीपैकी कोणतेही एक भावनेच्या भरात न ठरवता दोन्हीचे त्यांच्या त्यांच्या मर्यादेत काही ठराविक फायदे आणि तोटे आहेत. त्याबद्दल पूर्ण माहिती करून घेऊन आपल्यासाठी काय योग्य, काय शक्य यांचा विचार करूनच मगच फ्लॅट की प्लॉट याचा निर्णय घेणे संयुक्तिक ठरते.

१. कष्ट आणि मेहनत :

प्लॉटवर घर बांधताना बांधकामाचा पूर्ण आराखडा आगाऊ तयार करून घेणे आवश्यक असते. त्यासाठी आधी ले-आउटचे अप्रूवल असणे गरजेचे असते. संपूर्ण बांधकाम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी एखाद्या कुशल आर्किटेक्टची किंवा तंत्रज्ञाची गरज भासतेच भासते. बांधकामाकडे लक्ष ठेवण्याबरोबरच वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची सोय करणे आणि नानाविध कामांसाठी अनेकविध लोकांशी बोलणे, आपले काम करण्यासाठी त्यांना योग्य किमतीत राजी करणे अशी अनंत कामे आपल्याला करावी लागतात. 

याउलट जेव्हा तुम्ही फ्लॅट खरेदी करत असता, तेव्हा फ्लॅट, ती बिल्डिंग आणि एकूणच पूर्ण सोसायटीच्या बांधकामाची संपूर्ण जबाबदारी ही त्या ठराविक, विशिष्ट बिल्डरचीच असते. आपल्याला बांधकाम होताना लक्ष ठेवण्याची गरज नसून त्यानंतर फक्त फर्निचर आणि इंटिरियर डेकोरेशनच्या बाबतीतच लक्ष देऊन काम करून घ्यावे लागते. आणखी सांगायचे झाले तर फ्लॅट घेताना त्याबरोबरच इतर काही सुविधा म्हणजे, नियमित पाणीपुरवठा, लिफ्ट, पॉवर बॅक-अप, सिक्युरिटी आणि आणि इतर सुविधा जसे लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा, मोठ्या आणि वयस्कर लोकांसाठी स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक किंवा एखादे जिम या मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी लाभदायक ठरतात. 

स्वतःचा प्लॉट विकत घेऊन घर बांधताना मात्र या सर्व छोट्या-छोट्या गोष्टींचा पूर्ण विचार करून त्यानंतर संपूर्ण तयारी करूनच घर बांधावे लागते, तेव्हा या काळात लोक फ्लॅट घेणे जास्त पसंत करतात.

२. डिलिव्हरी (मालकी हक्क मिळणे) :

एखादा फ्लॅट खरेदी केल्यानंतर जर त्याचे बांधकाम एखाद्या मोठ्या सोसायटीत सुरू असेल तर तो फ्लॅट वापरायला मिळण्यासाठी काही वर्षांचा काळ जाऊ देणे अत्यावश्यक ठरते. याउलट तत्काळ इन्व्हेस्टमेंट करायची असल्यास प्लॉट ची उपलब्धता असणे एवढा एकच मुद्दा पुरेसा ठरतो. म्हणून एकूणच फ्लॅट पेक्षा प्लॉट हा लवकर मिळू शकतो त्यामुळे भरपूर पैसा लवकरात लवकर गुंतवायचा असल्यास तयार प्लॉट विकत घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे असे नक्कीच म्हणता येईल.

३. गुंतवणुकीचा मोबदला :

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार प्लॉटची किंमत फ्लॅटपेक्षा सर्वसाधारणपणे लवकर वाढीस लागते. याचे अत्यंत सोपे कारण म्हणजे प्लॉटचा पुरवठा हा या क्षेत्रात फ्लॅटच्या पुरवठयापेक्षा अगदीच कमी आहे. फ्लॅटच्या बाबतीत मात्र तो जसजसा जुना होत जातो, तसतशी त्या फ्लॅटची किंमत कमी-कमी होत जाते. प्लॉटच्या बाबतीत मात्र किती जुना, किती नवीन असा काही मुद्दाच उद्भवत नाही कारण मुळात तेथे काही बांधकामच झालेले नसते. प्लॉटची किंमत वाढण्याचे कारण त्या सभोवतालची जागा आणि आजूबाजूला येणारे बांधकाम क्षेत्रातील नवीन उपक्रम यावर बहुधा ठरते. बांधकाम क्षेत्रात साधारणपणे जितका वेळ जाईल तितकी प्लॉटची किंमत सहाजिकरित्या वाढत जाते. अर्थातच प्लॉटच्या खरेदीसाठी अनेक मोठमोठे बिल्डर्स कायमच प्रयत्न करीत असतात तेव्हा गरज असल्यास प्लॉट विकणे हे फ्लॅट विकण्यापेक्षा अत्यंत सोपे असते. 

४. टॅक्स :

फ्लॅट आणि प्लॉटमधील खरेदी संदर्भात टॅक्समध्ये मिळणारी सूट ही वेगवेगळ्या प्रकारे तपासणी करून नंतर ठरवली जाते. जेव्हा एखादी व्यक्ती नवीन फ्लॅटसाठी होमलोन (घरकर्ज) घेते तेव्हा दर महिन्यात त्या कर्जाचे व्याज भरतांना टॅक्समधून सवलत मिळू शकते. 

५. मिळकत :

जर दर महिन्याला भाडे मिळावे या अपेक्षेने तुम्ही गुंतवणूक करीत असाल तर ही गुंतवणूक तयार फ्लॅटमध्ये करणेच नेहमी फायदेशीर ठरते. फ्लॅट भाडेतत्त्वावर देऊन साधारणपणे दर महिन्याला काही मिळकत होणे हे फक्त फ्लॅटच्या बाबतीत गुंतवणूक केली असता शक्य ठरते. प्लॉट एखाद्याला भाडेतत्वावर देणे सहजासहजी शक्य होत नाही. 

निर्णय :

फ्लॅटमध्ये ओळखीचे क्षेत्र विस्तारले जाते. जवळ-जवळ घर असतात त्यामुळे ओळखी जास्त होतात, मैत्री वाढते, आणि अडचणीला एकत्र येऊन मदत करण्याने माणुसकीची भावना जपली जाते. अशाप्रकारे दोन्ही आपापल्या परीने योग्य आहे. आपल्याला दोन्ही कडे राहतांना समतोल साधता यायला हवा, म्हणजे दोन्ही ठिकाणचा विचार करणे फायदेशीरच ठरेल.

अर्थात प्लॉट काय किंवा फ्लॅट काय, राहण्यासाठी म्हणून घर हवं असेल, तर लक्ष ठेवून, मन लावून तयारी करून घ्यावीच लागते. दोन्ही पैकी जे सोयीचे, आवडीचे ते निवडावे आणि आणि पुढे आपल्या मनपसंत घरात राहण्याचा आनंद घ्यावा. कारण, घराला घरपण देण्यासाठी जीव तर लावावाच लागतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now
Open chat
Hello
How Can I Help You?